Join us  

अतिक्रमणमुुक्तीसाठी पोलीस सज्ज

By admin | Published: June 19, 2014 12:14 AM

पनवेल शहरातील गुदमरलेल्या रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी पनवेल शहर पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

पनवेल : पनवेल शहरातील गुदमरलेल्या रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी पनवेल शहर पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले हे पुढाकार घेऊन पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करुन देणार आहे. त्याकरिता खास पोलीस पथक नेमण्यात आले असून बंदोबस्तात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. परिणामी शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त होतील असा विश्वास शहरवासीयांना व्यक्त केला आहे. जे काम पालिकेचे आहे ते काम पोलिसांनी हाती घेतली आहे.पनवेलमधील आंबेडकर पुतळा ते कर्नाळा सर्कल व कर्नाळा सर्कलपासून वडाचे झाड या दरम्यान ना फेरीवाला क्षेत्र घोषित आहे. मात्र, आता पुन्हा फेरीवाले आणि हातगाड्यावाल्यांनी ठिय्या मांडण्यास सुरुवात केली. जिकडे तिकडे हातगाड्यांनी बस्तान बांधले आहे. वडापाव, भेलपूरी, पाणीपुरी, चायनिज, फळे, भाजीपाला यासारखे अनेक वस्तूंची विक्री करणाऱ्या गाड्यांची बजबजपुरी झाली आहे. विशेषत: शिवाजी चौक ते वडाचे झाड या दरम्यान हातगाडीवाल्यांचे अधिक प्रस्थ आहे. कृष्णाळे तलावाच्या बाजूची जागा पाणीपुरी आणि भेलपुरीवाल्यांना जणू काही आंदनच दिली आहे. या व्यतिरिक्त एमजी रोड, बस स्थानक परिसर, लाईन आळी, पंचरत्न हॉटेल परिसर हातगाड्यावाल्यांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे शहर बकाल तर दिसत आहेच या व्यतिरिक्त वाहतूक कोंडी होत आहेत. एक तर शहरातील रस्ते मुळातच अरुंद असून त्यात फेरीवाल्यांबरोबर हातगाडीवाल्यांचा वावर वाढतच चालला आहे. परिणामी रहदारीला अडथळे निर्माण होत असून काही ठिकाणी पदपथावरही या गाड्या उभ्या केल्या जातात. त्याचबरोबर इतर वस्तूंची विक्री करणारे विक्रेतही रस्त्यावर बसून व्यवसाय करताहेत, त्यामध्ये भाजीपाला, मासळी विक्रेत्यांचा समावेश असून त्यांनी पदपथ हायजॅक केले आहेत. त्याचबरोबर काही दुकानदारांनी आपले फलके त्याचबरोबर स्टॉल पदपथावर लावून अतिक्रमण केले आहे. शहरातील पदपथच गायब झाले असून पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. परिणामी गैरसोय तर होतेच त्याचबरोबर सोनसाखळी चोरीच्या घटना अधिक घडताहेत, महिला रस्त्यावरुन चालत असताना चोरांना त्यांच्या गळ्यातून दागिने खेचण्यास अधिक सुलभ होते त्याच जर पदपथावरुन चालल्या तर सोनसाखळी खेचता येत नाही. त्यामुळे शहरातील पदपथ मोकळे करावेत अशी मागणी जोर धरु लागली आहे. सोनसाखळी सारख्या चोऱ्यांच्या घटना रोखण्यासाठी पदपथ चालण्यासाठी मोकळे करुन देण्याचा हा विषय मध्यंतरी कफ आयोजित समन्वय बैठकीत पुढे आला होता. त्याचबरोबर वाहतूक कोंडीही फोडण्यास मदत होणार होईल, असे मत यावेळी अनेकांनी मांडले होते. या मुद्यावरुन पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनीही नाराजी व्यक्त केली होती. (वार्ताहर)