मुंबई : मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येणाऱ्या होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरात कोणतीही अनूचित घटना घडू नये,यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात जागोजागी नाकाबंदी करत संशयित व्यक्ती, वस्तू आणि वाहनांची तपासणी सुरू आहे. तसेच, पोलिसांनी गस्तीवर भर दिला आहे.
मुंबईत पोलिसांसोबत सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसाद पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि वाहतूक पोलीसही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिकस्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे.
साध्या गणवेशातील पोलीसही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे. दुसरीकडे निर्भया पथकाकडून गस्त सुरूच असून, काहीही मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच नियंत्रण कक्षातून पोलिसांकडून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.