Join us

कडक निर्बंधांसाठी पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:05 AM

नागरिकांची आठच्या आत घरी जाण्यासाठी धडपड..कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस सज्जनागरिकांची आठच्या आत घरी जाण्यासाठी धडपडलोकमत न्यूज ...

नागरिकांची आठच्या आत घरी जाण्यासाठी धडपड..

कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज

नागरिकांची आठच्या आत घरी जाण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसांकड़ून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात, ठिकठिकाणी कायमस्वरूपी नाकाबंदी करत तंबू उभारण्यात आले आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बल आणि सशस्त्र विभागातील अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा देण्यात आला आहे.

बुधवारी रात्री ८ नंतर पोलिसांकडून खासगी वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात येणार आहे. अशात, ज्याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी बेरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्याच जोडीला ठिकठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना आवाहन करण्यासाठी मेगाफोन, वाहने, तात्पुरते निवारे, पाणी, अन्न आदी व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशात, टोल नाक्यावर जास्तीचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहनांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याशिवाय गेल्यावर्षी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या धारावी, वरळी, कुरार, भांडूप आदी उपनगरांसह दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस कर्मचार्‍यांसाठी कोविड हेल्पडेस्क क्षेत्रीय स्तरावरही सुरू करण्यात आले आहे तसेच यावेळी पोलिसांनी काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बलाच्या पाच तुकड्या आणि सशस्त्र विभागातील १३७५ अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे.

....

आठच्या आत घरी जाण्यासाठी धडपड

यात, पोलिसांचा बंदोबस्त पाहता रात्री ८ पूर्वी घरी जाण्यासाठी नागरिकांची धडपड पहावयास मिळाली.

......

अफवावर सायबर पोलिसांचा वॉच

या काळात अफवा पसरू नये म्हणून सायबर पोलीस सोशल हालचालीवर लक्ष ठेवून आहेत तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

...

मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचे

लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी राहून या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.

....

सीसीटीव्हीद्वारे लक्ष

मुंबईतील पाच हजार सीसीटीव्हीद्वारे पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास ड्रोनचादेखील वापर करण्यात येणार आहे.