मुंबई : कुर्ला वाहतूक विभागातील कोरोना संशयित पोलिसाला उपचारासाठी झालेल्या टाळाटाळीची घटना ताजी असतानाच, वडाळा वाहतूक विभागातील शिपायालाही त्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अखेर त्याने याबाबतचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करताच खळबळ उडाली. अखेर, या व्हिडीओनंतर प्रशासनाने दखल घेत त्यांना केईएममध्ये उपचार सुरू केले.संबंधित पोलीस शिपायाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्याने पोलीस रुग्णालयात उपचार घेतले. तेथून रविवारी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथून कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेमुळे अस्वस्थ झालेल्या शिपायाने व्हिडीओद्वारे याबाबत वाचा फोडली. ते प्रतिबंधित करण्यात आलेल्या बरकत अली रोड परिसरात बंदोबस्ताला असताना हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. ही बाब रुग्णालय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेत उपचार सुरू करण्यात आले. यापूर्वी कुर्ला वाहतूक विभागाच्या पोलीस अंमलदाराला राजावाडी, कस्तुरबा, नायर आणि केईएम रुग्णालयाने बेड उपलब्ध नसल्याचे सांगत दाखल करून घेतले नव्हते. अखेर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद कांबळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर केईएमध्ये उपचार सुरू करण्यात आले. >मुंबई पोलीस दल कोरोनामुळे चिंंतेतराज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरीपार गेला आहे. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाºयांना बसताना दिसत आहे. पोलिसांवर विविध बंदोबस्ताची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप आणि संसर्गाची लागण न होता परतेल का हे दडपण या पोलीस वसाहतीमध्ये दिसून येत आहे. त्यात दोन पोलिसांचा बळी गेल्याने पोलीस दलात चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, वाकोला पोलीस ठाण्यातील ५८ वर्षीय पोलीस शिपायाच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मुलाने दिलेल्या माहितीत, सुरुवातीला ताप-खोकल्यामुळे वडिलांना कस्तुरबा रुग्णालयात नेले होते. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना चाचणी करण्यास सांगितले. मात्र चाचणी केली नाही. पुढे स्थानिक डॉक्टरकडून उपचार सुरू झाले. ताप वाढल्याने नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे चाचणी करत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.शुक्रवारी सकाळी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांना कोरोनाची लागण होती, हे स्पष्ट केले गेले. त्याच संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाच्या मोबाइल क्रमांकावरील घोळामुळे कुटुंबीयाशी संपर्क झाला नाही. वडिलांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर शनिवारी पोलीस दलाकडून त्यांच्या मृत्यूबाबत समजले होते. मात्र आपली कुठलीही तक्रार नसल्याचेही त्याने नमूद केले.
व्हिडीओद्वारे व्यथा मांडल्यानंतर पोलिसाला मिळाले उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 4:40 AM