पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:15+5:302021-01-17T04:07:15+5:30
धनंजय मुंडेंवरील आरोप प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून ...
धनंजय मुंडेंवरील आरोप प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या तरुणीचा शनिवारी पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पश्चिम उपनगरातील डी. एन.नगर सहायक पोलीस आयुक्तांकडे हा जबाब घेण्यात आला. सुमारे साडेपाच तास तिच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. आवश्यकता वाटल्यास तिला पुन्हा बाेलावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ती आपल्या वकिलासमवेत कार्यालयात पोहोचली. रासम यांनी त्यांच्या सहायकाच्या मदतीने तिचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली. अखेर सहा वाजेच्या सुमारास ती कार्यालयातून बाहेर पडली. रेणूने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तिच्याकडे सविस्तर माहिती घेण्यात आली. ती त्यांना पहिल्यांदा केव्हा भेटली, तिला कशाप्रकारे आणि कोणती, आमिषे दाखविली, इतक्या वर्षात तिच्यावरील अन्यायाबद्दल तक्रार का केली नाही, आदी प्रश्नोत्तरे करून तिचा जबाब घेण्यात आल्याचे समजते.
* व्हिडिओची धमकी देऊन शोषण
धनंजय मुंडे यांनी आपला व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध स्थापित केले, त्याबाबत आपण बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंडे यांनी दबाव टाकून दिशाभूल केल्याचे तरुणीने पाेलिसांना सांगितले.