पोलिसांनी केली हरविलेल्या मुलांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:53 AM2019-09-21T01:53:57+5:302019-09-21T01:54:04+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसवर विनापालक १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या निदर्शनास आला.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसवर विनापालक १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी या मुलाची विचारपूस करून त्याची घरवापसी केली.
शुक्रवारी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर पोलीस गस्त घालत होते. दुपारी २.४५ च्या सुमारास टर्मिनसवर विनापालक १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या निदर्शनास आला. या वेळी या मुलाला पोलीस चौकीत घेऊन नेले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, वलसाड येथून आलो आहे, असे १६ वर्षीय मुलाने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. मुलाच्या पालकांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
हरविलेल्या मुलांची विचारपूस करण्यासाठी विशेष पथक तैनात आहे. याद्वारे मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली जाते. मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे पालकाचा शोध घेतला जातो. मुलगा आणि पालक यांची ओळख पटवून मुलाला पालकांच्या स्वाधीन केले जात असल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.
>बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी स्थानकावर फलाट क्रमांक २/३ वर पोलीस गस्त घालत होते. या वेळी ७ वर्षीय मुलगा विनापालक निदर्शनास आला. या मुलाला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करण्यात आली. त्याने धारावी येथे राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पालकांचा शोध घेतला. पालकांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी मुलगा अणि पालक यांची ओळख पटवून मुलाला पालकांकडे सुपुर्द केले.