पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 09:26 AM2022-11-28T09:26:46+5:302022-11-28T09:27:32+5:30

अर्ज अपलोड होईना, चलनही भरता येईना; उमेदवारांवर कॅफेबाहेर रात्र काढण्याची वेळ

Police Recruitment : Website hangs everyone, Munde's demand for extension | पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी

पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई/बीड : महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर अखेरची तारीख आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

अडचणींमुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात, अशी भीतीही उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र उमेदवारांना पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज करता यावा यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यातील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
पोलिस भरतीची सूचना निघाल्यानंतरही नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे यावरून उमेदवारांमध्ये बराच संभ्रम होता. आता अर्जांची संख्या मोठी असल्याने किंवा एजन्सीच्या चुकीमुळे पोलिस भरती प्रक्रियेसाठीची वेबसाईट सतत हँग होणे व सर्व्हर डाऊन असण्याची अडचण जाणवत आहे.

ऑनलाइन चलन भरताना वेबसाइट हँग होत आहे. हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तासनतास कॉल वेटिंगवर असतो. 
- राजेश बागलाने, नेट कॅफेचालक, बीड

१५ दिवस मुदतवाढ 
द्या : धनंजय मुंडे      
मुंबई : गोंधळामुळे अनेक उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, तसेच तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  

अपघातात विरले पोलिस होण्याचे स्वप्न
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : पोलिस भरतीचा ऑनलाइन अर्ज भरून गावाकडे परत जाणाऱ्या महाविद्यालयीन युवकाच्या दुचाकीला कारने समोरून ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. बालाजी भीमराव पवार (१९, रा. हगलूर तांडा, ता. तुळजापूर) असे या तरुणाचे नाव आहे.

Web Title: Police Recruitment : Website hangs everyone, Munde's demand for extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.