मुंबई - येत्या 9 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या महामोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी केली आहे. मात्र या मोर्चापूर्वी मुंबई पोलिसांनीमनसेला धक्का दिला आहे. भायखळा ते आझाद मैदान या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्याची सूचना पोलिसांकडून मनसेला देण्यात आली आहे. मुंबईसह देशभरात घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात केली होती. तेव्हापासून मनसेच्या या नियोजित मोर्चाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या मोर्चासाठी मनसेकडून भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस खात्याने मोर्चाच्या या मार्गाला परवानगी नाकारली आहे. तसेच या मोर्चासाठी मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनंतर मनसेने आपल्या मोर्चासाठी नवा मार्ग निश्चित केला आहे. तसेत त्याचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून, मनसेच्या मोर्चाचा प्रस्तावित मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणारा आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे, त्यामुळेच या मार्गाला लाल सिग्नल देण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?; पोलिसांसमोर सुरक्षेचा प्रश्न
'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेऊन काम करते ; शिवसेनेचा गंभीर आरोप
९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा
दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच मनसेचा झेंडा बदलण्यात आला असून यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला आहे. महाअधिवेशनाच्या भाषणातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढला होता. तसेच देशात अंतर्गत कटकारस्थान निर्माण केलं जात असून मोर्च्याला उत्तर मोर्चाने असं सांगत त्यांनी ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केले होते.