Join us  

पोलिस राहिले उपाशी, कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप; अनेक मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा, यंत्रणाच कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 1:53 PM

मुंबईतील मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना पुरेसे जेवण दिले नसल्याचे निदर्शनास आले. चहा, नाश्ता, पाणी या सुविधांचीही वानवा असल्याचे दिसले. 

मुंबई : मुंबईतला मतांचा टक्का वाढावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग प्रयत्नशील होता. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली तेव्हा मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद यंत्रणांना पाहायला मिळाला. मतदारांमध्ये उत्साह असताना निवडणूक यंत्रणा मात्र कोलमडल्याचे चित्र होते. निवडणूक कर्मचारी आणि पोलिस यांना याचा कटू अनुभव आला. 

मुंबईतील मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना पुरेसे जेवण दिले नसल्याचे निदर्शनास आले. चहा, नाश्ता, पाणी या सुविधांचीही वानवा असल्याचे दिसले. 

प्रचंड उकाडा, त्यात मतदारांना आवरताना काहींशी होणारे वाद यामुळे पोलिस आणि निवडणूक कर्मचारी कातावल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात काही केंद्रांवर तर पोलिसांना कूलरमध्ये पाणी ओतण्याची जबाबदारी दिल्याचे आढळून आले.

 माहीम : माहीम परिसरात ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्र उघडण्यात आले आहे, त्यातील अनेक मतदान केंद्रांवर रविवारी दिवसभर पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणच दिले गेले नाही. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून कामावर आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रात्री दहा वाजता खाण्याचे डबे आणून देण्यात आले. दिवसभर हे लोक तसेच बसून होते. मतदानाच्या दिवशी सकाळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने सकाळचा नाश्ता मागवला, असे मतदान केंद्रांवरील अनेक पोलिसांनी सांगितले.

 धारावी : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधांचा फटका बसला. धारावीत काही मतदान केंद्रांवर वेळेत जेवण मिळाले नाही. कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस उपाशीपोटी काढावा लागला. धारावीतील कामराज मेमोरिअल इंग्लिश हायस्कूलमधील २०३, २०४ आणि २०५ केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सकाळी चहा आणि नाश्ता मिळाला नाही. त्यातच निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गोंधळामुळे दुपारचे जेवणही दुपारी दोननंतर मिळाले. मतदान केंद्र सोडून जाऊ शकत नसल्याने, तसेच मतदान केंद्राच्या परिसरातील आस्थापना बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.

 मालाड : पूर्व परिसरात निवडणुकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मतदानाच्या पूर्वसंध्येला पुरेसे जेवणही देण्यात आले नव्हते. काही पोलिस कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस त्यांना पाच चपात्या आणि भाजी असे जेवण देण्यात आले. त्याठिकाणी प्यायला पाणीदेखील उपलब्ध नव्हते. सोमवारी सकाळी वडा, समोसा असा नाश्ता दिला गेला, असेही काहींनी सांगितले. भर उन्हात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत मतदारही मोबाइल बंद करण्यावरून, गाड्या पार्किंग, विनाकारण होणारी गर्दी पांगवताना हुज्जत घालताना दिसत होते. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूक 2024