Join us

पोलिसांच्या खबऱ्यांचा बारमालकांना धसका

By admin | Published: April 29, 2017 2:05 AM

पोलिसांचे खबरे त्रास देत असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे. पोलिसांच्या खबऱ्यांच्या नावाखाली काही गुंड त्यांच्याकडून खंडणी

मुंबई : पोलिसांचे खबरे त्रास देत असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे. पोलिसांच्या खबऱ्यांच्या नावाखाली काही गुंड त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार ओनर्स असोसिएशनने गृहविभागाला निवेदन अर्जाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.पोलीस अधिकारी अनेकदा गणवेशात बारमध्ये तपासणीच्या नावाखाली येत असल्यामुळे घाबरून ग्राहक येत नाहीत. त्याचा परिणाम व्यवसायावर होतो, म्हणूनच समाजसेवा शाखेची चुकीची कारवाई, तथाकथित खबरे व गुंडांचा उपद्रव, महिला कर्मचारी वर्गाची कुचंबणा या सर्व समस्या दूर करून संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन अर्जाद्वारे केली आहे. तसेच या खबऱ्यांची यादीही देण्यात आल्याचे फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार ओनर्स असोसिएशनचे मोहनसिंग बेदी यांनी सांगितले. पोलिसांच्या समाजसेवा शाखेने व अधिकारी वर्गानेच आम्हाला हप्ते गोळा करायला सांगितले असून ते दिले नाहीत तर मात्र तुमच्यावर कारवाई होईल, असे गुंड व खबरे हे समाजसेवा शाखेचे नाव घेऊन सांगतात. त्यामुळे समाजसेवा शाखादेखील बदनाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)