Join us

तरुणाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार

By admin | Published: October 28, 2015 1:45 AM

धारावी येथे रहिवाशांनी केलेल्या मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम नाडर याचा मृत्यू झाला. या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

मुंबई : धारावी येथे रहिवाशांनी केलेल्या मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम नाडर याचा मृत्यू झाला. या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या विरुद्ध आज नातेवाईकांनी धारावी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पुरुषोत्तम नाडर (३१) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो धारावीमध्ये कुटुंबीयांसह राहत होता. १८ आॅक्टोबरला हा तरुण येथील ९० फूट रोडवरील धारावी रेस्टॉरंट परिसरात उभा होता. येथील पाणीपोईकडे तो पाणी पिण्यासाठी गेला, तेव्हा त्याच्याकडून पाण्याचे भांडे खाली पडले. ही बाब या ठिकाणी असलेल्या काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी त्याला बेदम चोप देत, धारावी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याची चौकशी केली. मात्र, तो दारूच्या नशेत असल्याने काहीही बोलू शकला नाही. काही वेळानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना त्याचा नाव, पत्ता काहीच माहिती नसल्याने तीन दिवस त्याचा मृतदेह बेवारस अवस्थेत होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळाताच, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, कुटुंबीयांनी धारावी पोलीस ठाण्यात जाऊन तो हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. (प्रतिनिधी)चौकशी सुरू, कारवाई होणार‘याबाबत चौकशी सुरू असून, जो कोणी यामध्ये दोषी असेल, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.- महेश पाटील, पोलीस उपायुक्त झोन ५