लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरफोडी करून २१ लाख रुपयांचे दागिने लंपास करत एका चोराने पळ काढला होता. या प्रकरणी जुहू पोलिसात महिलेने तक्रार दाखल केली होती. जुहू पोलिसांनी याबाबत कसून तपास करीत महिला दिनीच तिचे दागिने तिला परत मिळवून देऊन अनोखी भेट देत महिला दिन साजरा केला.
जुहू पोलीस ठाण्यात २ जानेवारी, २०२१ रोजी माला शहा नामक महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, त्या घरी नसताना सकाळी १० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच सोने आणि चांदीच्या दागिन्यांची चोरी करून पसार झाला.
याबाबत तक्रार दिल्याने जुहू पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४/२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पवार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. महिला दिनाच्या औचित्यावर शहा यांना त्यांचे चोरीला गेलेले जवळपास २१ लाखांचे दागिने पोलिसांनी परत केले. यासाठी शहा यांनी माने आणि जुहू पोलीस ठाण्याचे आभार मानले.