मुंबई : गणपती विसर्जनानंतर समुद्रातील मौल्यवान वस्तूंच्या शोधात तीन अल्पवयीन मुले बुडत असल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.शिवडीच्या कौला बंदर परिसरात अय्यपा सत्यवेक देवधर (१७), मनोज हरिजन (१४) आणि विनोद शंकर हरिजन (१७) हे तिघेही राहण्यास आहेत. गणपती विसर्जनानंतर समुद्रात मौल्यवान वस्तू मिळतील, त्या विकून जास्तीचा पैसा मिळेल, या आशेने त्यांनी दारूखाना कोळसा बंदरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उडी घेतली.मात्र, या शोधात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही समुद्रात बुडू लागले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच, त्यांनी शिवडी पोलिसांना कळविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नावगे यांच्यासह तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सागरी बोटीच्या मदतीने त्यांनी तिघांचा शोध सुरू केला. तिघांनाही सायंकाळी ५च्या सुमारास बाहेर काढण्यास पोलिसांना यश आले.तिघांनाही उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणीशिवडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. त्यांच्या चौकशीत वरील बाब उघडकीस आल्याची माहिती शिवडी पोलिसांनी दिली.
समुद्रात बुडणा-या तिघांना पोलिसांनी वाचविले : शिवडी पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:40 AM