पोलीस दिसले की मास्क नाकावर...नाहीतर गळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:47+5:302021-09-27T04:07:47+5:30
मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी नागरिकांची कोरोनाची भीती मात्र संपत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. आजही नागरिक मोठ्या ...
मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी नागरिकांची कोरोनाची भीती मात्र संपत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. आजही नागरिक मोठ्या प्रमाणात विनामास्क फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून काही नागरिक फक्त नावाला मास्क वापरताना दिसत आहे. पोलिसांनी यूटर्न घेताच मास्क पुन्हा नाकाखाली जाताना दिसत आहे.
कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकडूनही धडक कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईचा आकडा वाढत असल्यामुळे मुंबई पोलिसांनी ट्वीट करत, ‘मुंबईकरांनो हे आकडे धक्कादायक’ असल्याचे म्हटले होते.
मुंबई पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७४२ गुन्हे नोंद केले आहेत. त्यानंतर यावर्षीच्या २० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या कारवाईत दंड वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली.
पोलिसांकड़ून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटन स्थळ, रेल्वे, बसस्थानक तसेच रहिवासी इमारतींबरोबर झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. पालिकेच्या पावती पुस्तकावर २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. २० फेब्रुवारीपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरू केली. यात आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आजही अनेक नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही जण फक्त कारवाई, दंडाच्या भीतीने मास्क लावत असल्याचे दिसते. पोलीस दिसले की, गळ्यातला, खिशातला मास्क नाकावर येतो. दुर्लक्ष होताच मास्क पुन्हा नाकाखाली जात असल्याचे दिसत आहे.
...
पोलिसांशीच वाद...
काही जण दंड भरायला नको म्हणून पोलिसांसोबत वाद घालत धक्काबुकी करण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. काहींना थेट कारागृहाची हवा खावी लागत आहे.
...
जनजागृतीवर भर..
मुंबई पोलिसांकडून ट्विटरवरून वेळोवेळी कोरोना नियमांचे महत्त्व पटवून देत पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कारवाईच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तवही मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.