Join us

आत्महत्येपासून परावृत्त करत, पोलिसांची ‘सेल्फी विथ आजी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 8:33 AM

पंतनगर पोलिसांच्या निर्भयामुळे जगण्याची उमेद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  ‘मला जगायचं नाही, मला मरायला औषध आणून द्या’, असे म्हणत चंदा किसन सोनावणे (८४) या आजींनी त्यांना लावण्यात आलेल्या ऑक्सिजन नळ्या खेचण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली आणि पंतनगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने त्यांच्या घरी धाव घेत त्यांची समजूत काढली. त्यामुळे आत्महत्येच्या विचारापासून त्या परावृत्त झाल्या आणि चक्क पोलिसांसोबत त्यांनी सेल्फीही काढली.

घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगर येथे सोनवणे आजी या एकट्याच राहतात. त्यांचा भाचा सुनील मगरे याच्या नावावर घर केले आहे. मात्र, सोनवणे यांनीच त्याला सध्या सोबत राहण्यास मनाई केली आहे. मात्र, म्हातारपणामुळे त्यांना आरोग्याच्या बऱ्याच कुरबुरी आहेत. त्यातच अंथरुणाला खिळलेल्या आणि सतत नाकाला लावण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या नळीमुळे त्या आयुष्याला कंटाळल्या होत्या. त्यातच त्यांनी २१ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ऑक्सिजन काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत समजल्यानंतर पंतनगर निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मंगला शिंदे आणि सहायक फौजदार दयात हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले. त्यावेळी सोनवणे आजी आजारपण आणि एकटेपणामुळे नैराश्यात गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडेदेखील त्यांनी आयुष्य संपवण्याचे औषध डॉक्टरकडून आणून द्या, अशी मागणी केली. त्यावर तुम्ही आधी आराम करा, असा सल्ला देत शिंदे यांनी आजींशी गप्पा मारत त्यांना त्या विचारापासून परावृत्त केले, तर भाचा सुनील मगरे याला त्यांची काळजी घेण्याचा सल्ला देत ८५९१९३७५४८ हा निर्भया क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. हे पथक वेळोवेळी जाऊन सोनवणे आजीची विचारपूस करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

टॅग्स :मुंबईपोलिस