Join us

दसरा मेळाव्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Published: October 11, 2016 6:05 AM

पाकिस्तानी अतिरेक्यांकडून घातपाती कारवायांच्या शक्यतेतून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मुंबईसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असल्याने शिवाजीपार्क

मुंबई : पाकिस्तानी अतिरेक्यांकडून घातपाती कारवायांच्या शक्यतेतून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मुंबईसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असल्याने शिवाजीपार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील सहा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी तर सात मार्गांवर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.मुंबईवर हवाई हल्ल्याच्या शक्यतेतून पोलिसांनी याआधीच ड्रोन, रिमोट कंट्रोल एरियल उपकरणे, पॅरा ग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणांना धारा १४४ अन्वये बंदी घालण्यात आली आहे. त्यातच येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याच्या शक्यतेतून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल १ हजार पोलीस बल या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्याला आत सोडण्यात येणार असल्याने शक्यतो शिवसैनिकांनी लवकर यावे आणि शक्यतो आपल्यासोबत सामान आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.शहाराच्या मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, ड्रोन कॅमेरे यांच्या मदतीने संशयास्पद व्यक्ती, वस्तू आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख देवेन भारती यांच्यासह दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर. डी. शिंदे यांनी शिवाजी पार्क परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)वाहतुकीस बंदी..स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर सिद्धिविनायक जंक्शन ते कपडे बाजार, राजा बढे चौक ते केळुसकर मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग ते पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन, गडकरी चौक ते केळुसकर मार्ग, सेनापती बापट मार्ग ते दादासाहेब रेगे मार्ग, बाळ गोविंददास मार्ग ते पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन.पार्किंग बंदी..एस. व्ही. एस. रोड, केळुसकर रोड, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग.पार्किंगची ठिकाणे..सेनापती बापट मार्ग, रेती बंदर, माहीम मैदान, माटुंगा फाइव्ह गार्डन.