बिल्डरांवर पोलिसांनी कारवाई करावी
By admin | Published: October 20, 2015 01:52 AM2015-10-20T01:52:13+5:302015-10-20T01:52:13+5:30
नवी मुंबई येथील दिघा गावातील बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असलेल्या बिल्डर्सविरुद्ध कोणीतरी तक्रार करण्याची वाट पहात बसण्यापेक्षा स्वत:हून कारवाई करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने
मुंबई :नवी मुंबई येथील दिघा गावातील बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असलेल्या बिल्डर्सविरुद्ध कोणीतरी तक्रार करण्याची वाट पहात बसण्यापेक्षा स्वत:हून कारवाई करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. तर आतापर्यंत सहा बिल्डर्स व दोन दलांलांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी खंडपीठाला दिली.
या गावातील बेकायदा बांधकामांविरुद्ध मयुरा मारू आणि राजीव मिश्रा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती. रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सहा बिल्डर्स व दोन दलालांवर गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिसांच्या वतीने अॅड. मौलीना ठाकूर यांनी खंडपीठाला दिली. तसेच सिडको आणि एमआयडीसीला बिल्डर्सविरधिात तक्रार करण्याचूी विनंती पोलिसांनी केली असल्याचेही अॅड. ठाकूर यांनी खंडपीठाला सांगितले.
‘कोणीतरी पिडीत व्यक्तीने पुढे येऊन एफआय आर नोंदवण्याची तुम्हाला (पोलीस) आवश्यकता काय? पोलीस असहाय्य आहेत? तुम्ही स्वत:च कारवाई का करू शकत नाही? स्वत:हून दखल घेण्यासारखी ही केस नाही का? गुन्हा घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून दखल घेऊन कारवाई करावी,’ अशा शब्दांत खंडपीठाने पोलिसांना फटकारले.
याचिकाकर्त्यांनी याचिकेसोबत जोडलेल्या कागदपत्रांचा उपयोग एफआयआर नोंदवण्यासाठी केला जाऊ शकतो. ही कागदपत्रे पाहा आणि आम्हाला तुमची भूमिका काय असणार आहे ते २१ आॅक्टोबरपर्यंत सांगा, असे बजावित ‘तुम्ही जर योग्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवलात तर फ्लॅट विकत घेणाऱ्या लोकांचे पैसे बिल्डर्सकडून वसूल करता येऊ शकतात,’ असे स्पष्ट केले. आणि या याचिकेवरील पुढील सुनावणी २१ आॅक्टोबरपर्यत ठेवल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)