पोलीस ठाण्यात गटारी साजरी करण्यास मनाई; सहपोलीस आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:17 AM2019-07-22T03:17:51+5:302019-07-22T03:18:09+5:30
पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असेही बजावण्यात आले आहे
मुंबई : पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्या झालेली व्यक्ती, आत्महत्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी गटारीला कोंबडी किंवा बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. यातून अंधश्रद्धेला खतपाणी न घालण्यासाठी गटारी साजरी करू नये, अशा सूचना कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात गटारी साजरी केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेशही रविवारी जाहीर केलेल्या पोलीस पत्रकाद्वारे सर्वांना देण्यात आल्या आहेत.
पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असेही बजावण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदा २ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असून, गुरुवारी १ आॅगस्ट रोजी आषाढी अमावस्या म्हणजेच गटारी आहे. या दिवशी किंवा दोन-तीन दिवस आधी पोलीस ठाण्यांमध्ये गटारी साजरी केली जाते. यात, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांबरोबरच विशेष शाखा, पोलिसांशी संबंधित इतर कार्यालयातही कोंबडी - मटणाचे जेवण केले जाते. ही प्रथा बंद करावी, अशा सूचना त्यांना पत्रकातून देण्यात आल्या आहेत.
प्राण्यांची पोलीस ठाण्यात कत्तल करणे हे बेकायदेशीर कृत्य असून, मुंबई महापालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुअल्टी टू अॅनिमल अॅक्ट १९६०, मुंबई पोलीस कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा आहे. हा गुन्हा करू नका आणि प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांना देण्यात आले आहेत.