पोलीस स्थानकाला मिळाला ‘कॉर्पाेरेट लूक’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:16 AM2018-12-03T06:16:06+5:302018-12-03T06:16:17+5:30
अग्नी प्रतिबंधक यंत्रणेने परिपूर्ण असलेली ही एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरची इमारत नसून, विलेपार्ले येथील पोलीस ठाणे आहे.
मुंबई : चार मजली इमारत, ४० हून अधिक संगणक, आरामासाठी स्वतंत्र रुम, वायफाय सुविधा, अत्याधुनिक उपाहार गृह, पार्किंगसाठी मोठे मैदान, अग्नी प्रतिबंधक यंत्रणेने परिपूर्ण असलेली ही एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरची इमारत नसून, विलेपार्ले येथील पोलीस ठाणे आहे. जिविके कंपनीच्या सहाय्याने हे मुंबईतील पहिले अत्याधुनिक पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांत अशा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारतर्फे जिल्हा नियोजन समितीतून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विलेपार्लेतील या अत्याधुनिक इमारतीचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीत ही ४ मजली इमारत उभारण्यात आली आहे. साडे बारा हजार चौरस फुटांमध्ये असलेल्या या इमारतीत २० पोलीस वाहने उभी राहतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसा प्रकाश आणि पंख्याचा वापर न करता पर्यावरणपूरक मोकळे आणि हवेशीर वातावरण राहील, अशी इमारतीची रचना करण्यात आली आहे.
त्यात पोलिसांसाठी अद्ययावत व्यायामशाळा, उपाहारगृह, संपूर्ण इमारतीत वायफाय सुविधा, अंमलदार, अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी ४ स्वतंत्र खोल्या, तसेच अल्पवयीन मुलींच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पॉक्सो सेलही यात उभारण्यात आला आहे. तसेच पोलिसांसाठी ४० संगणक ठेवण्यात आले आहेत. तपासासाठी स्वतंत्र खोल्याची
देखील यात व्यवस्था करण्यात आली आहे.
या इमारतीचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या पोलीस स्थानकाच्या धर्तीवर मुंबईतील इतर पोलीस ठाणी तयार व्हावीत, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी केली.
>आम्ही घरापेक्षा पोलीस ठाण्यातच जास्त वेळ कार्यरत असतो. त्यामुळे अशा प्रसन्न वातावरणात काम करण्याची संधी मिळाल्यास आमच्यावरील ताण आपोआपच कमी होईल.
- राजेंद्र कणे, पोलीस निरीक्षक, विलेपार्ले पोलीस स्थानक.