पोलीस स्टेशनमध्ये शिरले पाणी
By admin | Published: July 28, 2014 12:32 AM2014-07-28T00:32:31+5:302014-07-28T00:32:31+5:30
रविवारी पावसाने शहरात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते, तर नेहमीप्रमाणे यंदाही तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे देखील पाण्याखाली गेले होते
नवी मुंबई : रविवारी पावसाने शहरात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते, तर नेहमीप्रमाणे यंदाही तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे देखील पाण्याखाली गेले होते.
शहरात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांना सुट्टीचा आनंद हा घरातूनच घ्यावा लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नवी मुंबईत ९०.६७ मिमी इतका पाऊस झाला. त्यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे वाशी येथील शबरी हॉटेल समोरील भाग जलमय झाला होता. तर बेलापूर गाव येथील तलावही तुडुंब भरुन त्याचे पाणी लगतच्या परिसरात पसरले होते. ऐेरोली येथील एनएमएमटीच्या डेपोतही बरेच पाणी साचल्याने प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी पावसातच नेरुळच्या एअर इंडिया वसाहतीच्या ठिकाणी विद्युत डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटनाही दुपारी घडली. त्याशिवाय घणसोली व कोपरखैरणे येथील रेल्वे स्थानकाचे भुयारी मार्ग देखील नेहमीप्रमाणे जलमय झाले होते. सानपाडा रेल्वे स्थानकाचा भुयारी मार्ग व लगतच्या मार्गावर देखील पाणी साचलेले होते. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हे प्रतिवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असते. रविवारीही तेथे हेच चित्र पहायला मिळाले. पोलीस ठाण्यातच किमान दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातच पोलिसांना तेथे थांबावे लागले. तर आपले कर्तव्य बजावत पावसाच्या पाण्यात तेथील साहित्य भिजू नये यासाठी त्याची उठाठेव देखील पोलिसांना करावी लागली. यावरुन तेथे पावसाचे पाणी साचू नये यासाठी केली जाणारी उपाययोजनाही फेल जात असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)