पोलिसांनी टोइंग करून नेलेल्या कारमधून चोरी
By admin | Published: May 24, 2015 01:04 AM2015-05-24T01:04:20+5:302015-05-24T01:04:20+5:30
वरळीच्या पोद्दार रुग्णालयाबाहेरून टोइंग करून वरळी पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आलेल्या व्हॅगन आर कारमधील दागिने, रोकड, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरी झाल्याचा आरोप मालकाने केला आहे
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
वरळीच्या पोद्दार रुग्णालयाबाहेरून टोइंग करून वरळी पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आलेल्या व्हॅगन आर कारमधील दागिने, रोकड, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरी झाल्याचा आरोप मालकाने केला आहे. ही कार रुग्णालयाबाहेर बेवारस अवस्थेत असल्याने पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात आणली होती. मालकाच्या तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल, असे वरळी पोलिसांनी सांगितले.
मंत्रालयातील शिक्षण विभागात चालक म्हणून काम करणाऱ्या रंगनाथ जाधव (५२) यांच्यासोबत हा प्रकार घडला. जाधव भांडुपच्या पाटकर कम्पाउंडमध्ये राहतात. त्यांची मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत. जाधव यांना मणक्याचा तर त्यांच्या पत्नीला वाताचा त्रास आहे. ५ मे रोजी दोघेही वरळीच्या पोद्दार रुग्णालयात दाखल होते. त्यांनी त्यांची व्हॅगन आर कार रुग्णालयाबाहेर पार्क केली होती. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा कार तेथे नव्हती. कार चोरी झाली असावी किंवा टोइंगवाल्यांनी वरळी वाहतूक चौकीत नेली असावी या शक्यतेने त्यांनी शोधाशोध सुरू केली. इतक्यात वरळी पोलीस ठाण्यातून जाधव यांना फोन आला. तुमची कार बेवारस अवस्थेत होती. ती उचलून पोलीस ठाण्याच्या आवारात आणली आहे. कार सोडविण्यासाठी कागदपत्रे घेऊन या, असे त्यांना सांगण्यात आले. कार सुरक्षित असल्याच्या आनंदात जाधव चौकीत गेले. दंड भरला. कार सोडवून भांडुपच्या घरी आले. घरी येताच कारमधील सामान तपासले. तेव्हा दागिने आणि पैशाचे पाकीट गायब होते, अशी माहिती त्यांच्या पत्नी रूपाली यांनी लोकमतला दिली. त्यानंतर जाधव यांनी तत्काळ वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गाडीतील दागिने, पैसे, बँक एटीएमसह महत्त्वाचे कागदपत्रेही चोरी झाल्याचा दावा करण्यात आला.
दुसरीकडे पोद्दार रुग्णालयाबाहेर बेवारस वाहन उभे असल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार वरळी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी गाडीची तपासणी करून ती वरळी पोलीस ठाण्यात आणली. वाहनांतील कागदपत्रावरील माहितीवरून जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र या तपासणी दरम्यान गाडीतील पर्सबाबत कल्पना नाही. जाधव दाम्पत्याच्या तक्रारीवरून त्यांचा तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोपट टिकेकर यांनी दिली.