पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:20+5:302021-04-13T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाने सोमवारी एका पोलिसाचा बळी घेतला. मोहन दगडे (५४) असे या पोलिसाचे नाव असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने सोमवारी एका पोलिसाचा बळी घेतला. मोहन दगडे (५४) असे या पोलिसाचे नाव असून, ते वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दगडे हे अंधेरी पूर्व परिसरात दोन मुलगे आणि पत्नी यांच्यासह राहत होते. त्यांची पत्नी गृहिणी असून, मुले शिक्षण घेत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च, २०२१ रोजी ऑक्सिजन कमी झाल्याने दगडे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांना तातडीने वांद्रे येथील बीकेसी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दगडे हे वरिष्ठ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांशी रविवारपर्यंत संपर्कात होते; मात्र सोमवारी अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसल्याचे नटे यांनी सांगितले. याबाबत समजताच नटे आणि अन्य सहकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे धाव घेत त्यांना धीर दिला, तसेच वाकोला पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही योग्य ती पावले तातडीने उचलल्याचे नटे यांनी नमूद केले.
.........................