पालिकेच्या सफाई कामगार महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:39 AM2018-08-11T01:39:36+5:302018-08-11T01:39:38+5:30
महापालिकेच्या जी नॉर्थ विभागात पैशांच्या देवाणघेवाणीवरून सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्यानेच चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.
मुंबई : महापालिकेच्या जी नॉर्थ विभागात पैशांच्या देवाणघेवाणीवरून सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्यानेच चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आरोपी गजानन चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पालिकेच्या जी नॉर्थ विभागातील घनकचरा विभागात गजानन आणि पीडित महिला काम करतात. काही महिन्यांपूर्वी महिलेने आर्थिक अडचणींमुळे गजानन यांच्याकडून पैसे उधारीवर घेतले होते. मात्र, पीडित महिला वर्ष उलटून गेले तरीही पैसे देत नव्हती. वारंवार मागूनही ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गजाननचा राग अनावर झाला होता.
गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ते दोघेही कामावर आले असता, त्यांच्यात पैशांवरून पुन्हा वाद झाला. याच वादातून गजाननने महिला स्वच्छतागृहात जाऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. वेळीच पालिकेतल्या उपाहारगृहात काम करणाºया एका कर्मचाºयाने महिलेला वाचवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर इतर सहकाºयांनी तिला उपचारासाठी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी धाव घेत, गजाननला अटक केली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.