पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष

By मनीषा म्हात्रे | Published: May 13, 2024 10:23 AM2024-05-13T10:23:18+5:302024-05-13T10:26:25+5:30

दुसरीकडे आवश्यकतेनुसार बंदोबस्तात बदल करत प्रतिबंधात्मक कारवायांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

police system alert special attention on social media | पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष

पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष

मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी

बदललेली राजकीय समीकरणे, बड्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि आरोप-प्रत्यारोपांबरोबरच निवडणुकीला राजकीय, धार्मिक रंग देण्यासाठी सुरू असलेली धडपड लक्षात घेत मुंबईपोलिसांनी खबरदारीची पावले उचलत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. मुंबईपोलिसांनी खऱ्या अर्थाने खबरदारी घेत संवेदनशील ठिकाणांसह हालचालींवर वॉच ठेवला आहे. तर, दुसरीकडे आवश्यकतेनुसार बंदोबस्तात बदल करत प्रतिबंधात्मक कारवायांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांच्या दिमतीला निमलष्करी दल, राज्य राखीव दल, होमगार्ड, अशी विविध पथके शहरात सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुंबई शहर, उपनगरांतील सहा मतदारसंघांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी, नेते, प्रमुख व्यक्ती, धर्मगुरू यांच्याशी बैठका सुरू ठेवत पोलिसांकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. या काळात जवळपास ४५ ते ५० हजारांचा फौजफाटा शहरात तैनात आहे. 

मुंबई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. कुठल्याही चुकीच्या पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेकडो पोस्ट डिलीट करण्यात येत आहेत. कोणीही चुकीची माहिती अथवा पोस्ट शेअर केल्यास थेट कारवाईचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. 

निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. त्यासाठी मुंबई शहर, उपनगर, तसेच मुंबई लगतच्या शहरांच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली असून, गाड्यांची तपासणी सुरू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या काळात मतदारांना पैशांचे वाटप होत आहे का? याकडे पोलिस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्याने सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब स्कॉड, एटीएससह विविध तपास यंत्रणा सज्ज आहे.

मुंबईत १०७, सीआरपीसीअंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाई करण्यात आली आहे, तर  ११० सीआरपीसी कायद्यांतर्गत २,१५४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. या आरोपींकडून लेखी करारपत्र घेत त्यांना योग्य ती समजही देण्यात आली आहे, तसेच सीआरपीसी १५१ (३) अंतर्गत ९१६ कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ५३ जणांना अजामीनपात्र वाॅरंट बजावण्यात आले आहे. मुंबईतून तडीपार केलेले, मात्र विनापरवाना पुन्हा शहरात आलेल्या ६२ जणांची धरपकड करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १२०, १२२, १३५  व १४२ अन्वये संशयितपणे वावरणाऱ्या १७५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय  एमपीडीए कायद्यांतर्गत ६ जणांवर कारवाई केली आहे. शहरात अवैध दारू विक्री, अवैध धंद्यांवर २४ ठिकाणी छापे टाकून ३० जणांना अटक, अनधिकृत १५४ फेरीवाल्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. २०६ ठिकाणी काॅम्बिग ऑपरेशन राबवत फरार ९६४ आरोपींपैकी २३० आरोपी मिळून आले. दंगेखोर, शांतता भंग करणाऱ्यांना १४९ अंतर्गत नोटीस बजावत निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.
 

Web Title: police system alert special attention on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.