Join us

पोलिसांकडून साडेदहा हजारावर गुंडांवर कारवाई, विधानसभा निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:07 PM

मुंबई शहर व उपनगरात एकुण ३६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे

मुंबई : विधानसभा निवडणूकीत येत्या दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून मुंबईपोलिसांनी त्याबाबत आतापासून खबरदारी घेतली आहे. निवडणूकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी मुंबई शहर व उपनगरातील तब्बल साडे दहा हजारजणांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये काही जणांना तडीपारच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

मुंबई शहर व उपनगरात एकुण ३६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूकीच्या दृष्टिने आवश्यक तयारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी उपायुक्त व अप्पर आयुक्तांकडून बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार, खून, मारामारी, संघटित गुन्हे आदी आदी प्रकारात सहभागी असलेल्यांची यादी बनविण्यात आलेली आहे. त्यांच्यावरील गुन्ह्याच्या स्वरुपाप्रमाणे संबंधितावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. जवळपास साडे दहा हजारजणांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. निवडणूकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शांततेचा भंग करणारे, सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविणाºयावरही कारवाईचा बडगा वापरला जाणार आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस