पोलिसांना मिळणार हक्काच्या घरासाठी कर्ज; काय आहे डीजी लोन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:08 AM2023-07-15T09:08:42+5:302023-07-15T09:09:03+5:30
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई : पोलिसांच्या घरांसाठी तीन वर्षे बंद असलेली डीजी लोन योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावर्षी ७०० कोटी रुपये पोलिसांना स्वत:च्या घरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, व्याजमुक्त कर्जही त्यासाठी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती पोलिसांच्या अर्ध वार्षिक गुन्हे आढावा परिषदे दरम्यान दिली होती.
काय आहे डीजी लोन?
डीजी लोन योजना ही महाराष्ट्र पोलिस दलातील असणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यामार्फतच सहजपणे २० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते.
सव्वालाख कर्मचारी...
राज्यभरात १ लाख २० हजार पोलिस कर्मचारी आहेत. तर १८ ते २० हजार अधिकारी आहे. आजही अनेक जणांकडे हक्काचे घर नाही.
...म्हणून होती बंद
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पोलिसांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, योजना पुन्हा सुरू झाली आहे. आजही हजारो पोलिसांना हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहे. अशावेळी हजारोंनी गृह कर्जासाठीचे अर्ज सरकार दरबारी प्रलंबित आहेत. याच गोष्टींचा विचार करत डीजी लोन योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.