सूर्यकांत वाघमारे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महामुंबईची तरुणाई हुक्याच्या नशेत गर्त असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी २८ हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. मात्र, यानंतरही काही हुक्का पार्लर सुरू असून त्यांचे मालक काही शासकीय अधिकाऱ्यांचे नातलग आहेत. यामुळे हुक्का पार्लर संबंधी ठोस कायदाच नसल्याचा आधार घेत त्यांच्याकडून पोलिसांनाच ज्ञान पाजळवले जात आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हुक्का संस्कृती फैलावत चालली असून, त्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. विशेष बाब म्हणजे, मागील आठ ते दहा महिन्यांत हे हुक्का पार्लरचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. अगदी पहाटेपर्यंत हे हुक्का पार्लर चालत असून, त्या ठिकाणी तरुण-तरुणी हुक्याचा दम मारत बसत आहेत. त्यापैकी बहुतांश हुक्का पार्लर पालिकेच्या गुमस्ता, हॉटेल परवानाच्या नावाखाली चालत आहेत. मात्र, हुक्याच्या तलफेने रात्री-अपरात्री घराबाहेर फिरणाऱ्या तरुण-तरुणींमुळे शहरात कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. हीच बाब ‘लोकमत’ने शहरातील हुक्का पार्लरचे स्टिंग आॅपरेशन करून उघड केली होती. ‘लोकमत’च्या या दणक्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलीस यंत्रणेने अखेर सर्वच हुक्का पार्लरची झडाझडती घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार २८ हुक्का पार्लरवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये अवघ्या एपीएमसी पोलिसांनी १९ कारवाया केल्या असून, वाशी पोलिसांनी सहा, नेरुळ पोलिसांनी दोन तर कोपरखैरणे पोलिसांनी एक कारवाई केली आहे. तर कारवाईच्या निमित्ताने काही हुक्का पार्लरच्या ठिकाणी गेलेल्या पोलिसांना विरोधालाही सामोरे जावे लागले.सुरू असलेल्या हुक्का पार्लरपैकी काही शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नातलगांचे आहेत. यामुळे स्थानिक पोलीस त्या ठिकाणी कारवाईला जाताच त्यांच्यावर शासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हुक्का पार्लरवर नियंत्रणासाठी शासनाने विशेष कायदा करण्याची गरज व्यक्त होत आहे. राज्य शासनाने २०११मध्ये हुक्का पार्लरबंदीचे सकारात्मक पाऊल उचलले होते. या वेळी शासनाच्या भूमिकेविरोधात झालेल्या याचिकेनंतर न्यायालयाने हुक्का पार्लरसाठी नियमावली आखून दिली आहे. तर सिगारेट आणि इतर पदार्थ कायद्याअंतर्गत (कोप्ता) पोलिसांना कारवाईचे अधिकार दिले आहेत; परंतु या नियमावलीत हुक्का पार्लरचालकाने नियम भंग केल्यास साधारण दोनशे रुपये दंडाची तरतूद असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे हुक्का पार्लर चालकांवर कायद्याचा धाक राहत नसून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हुक्का पार्लरवर कारवाईच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार एपीएमसी, वाशी, कोपरखैरणे व नेरुळ परिसरातील हुक्का पार्लरवर कारवाया झाल्या आहेत. तर त्यांच्यावर अधिक ठोस कारवाईच्या अनुषंघाने कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत.- डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपआयुक्त.
पोलिसांची २८ हुक्का पार्लरवर कारवाई
By admin | Published: June 01, 2017 5:59 AM