मुंबई : कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार नुकताच पवईत घडला. एका पोलिसाने हुंड्यासाठी आपल्या २२ वर्षीय पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.किरण नगराज पवार (३०) असे त्या पोलिसाचे नाव असून, तो धुळ्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. विवाहितेने शिरपूर पोलीस ठाण्यातही मदत मागितली. मात्र, तेथील पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अखेर तिने मुंबई गाठून या प्रकरणी तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून तीन महिन्यांनंतर पवई पोलिसांनी तिचा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला.मरोळ पोलीस वसाहतीत २२ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील पोलीस शिपाई पवारसोबत तिचा विवाह झाला. वडिलांनी लग्नाचा खर्च म्हणून दीड लाख रुपये, तसेच २६ गॅ्रमचे दागिने दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पती आणि सासूमध्ये किरकोळ वाद झाला. त्याच दरम्यान नेहाने सासूचे जेवणाचे ताट उचलले, म्हणून पतीने तिला मारहाण सुरू केली. त्या दिवसापासून तिच्यावर अत्याचार सुरू झाले. काही दिवसांनंतर सासूने जेवणावरून टोमणे मारत, महिनाभरातच तिला घराबाहेर काढले. समेटानंतरही हा प्रकार सुरुच होता.
हुंड्यासाठी पोलिसाकडून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:42 AM