Join us

महापुराच्या आपत्तीमुळे पोलिसांच्या बदल्या लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण आपत्तीमुळे या आठवड्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण आपत्तीमुळे या आठवड्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या व बढत्यांचा ‘मुहूर्त’ हुकला आहे. त्यासंबंधी बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे यास पंधरवडाभर विलंब होण्याची शक्यता आहे. संबंधित आयपीएस व अन्य अधिकाऱ्यांमध्ये त्यामुळे धास्ती वाढली आहे.

११ बढत्यांसह जवळपास ५० आयपीएस अधिकाऱ्यांसह व पीएसआय ते अधीक्षक (मपोसे) दर्जापर्यंतच्या ५०० वर अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यांच्यासह विनंतीवर बदलीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे यावर्षी ३० जूनपर्यंत सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या काळात विरोधकांकडून सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आला होता, त्यामुळे त्यावेळी बदल्यांचा विषय बाजूला ठेवण्यात आला. त्यानंतर ३० जुलैपर्यंत ‘जीटी’ व १५ ऑगस्टपर्यंत विशेष बदल्या करण्याचे निश्चित केले होते. त्याबाबत काम सुरू असतानाच गेल्या आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. आपद्ग्रस्तांना मदत व पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री त्या त्या परिसरात ठाण मांडून आहेत, त्यामुळे या आठवड्यात बदल्यांसंदर्भात अपर मुख्य वा सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पीईबीची बैठक रद्द करण्यात आली. त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळे पोलीस अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे बदल्यांचा मुहूर्त लांबणीवर पडल्याने संबंधित घटकांत अस्वस्थता वाढली आहे.

पांडे गॅझेटवर लक्ष

प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक इच्छुक अधिकारी, अंमलदार यांना स्वतः भेटण्याचा पायंडा सुरू केला आहे. मुख्यालयातील अन्य अधिकाऱ्यांना ते तिकडे फिरकूही देत नाहीत. गेल्या चार महिन्यांत जवळपास दीड हजारांवर जणांनी ‘ओआर’ घेतला असून, त्यापैकी ९५ टक्के बदलीसंदर्भात आहेत, त्याशिवाय काहींनी अर्जाद्वारे विनंती केली आहे, तर काही मंत्रालयातून नावे आली आहेत. या सर्वांचे कोणत्या निकषांवर आणि कशा बदल्या केल्या जातात, किती जणांना न्याय देतात, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागून आहे.