मुंबई : जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटूनही मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुमारे एक हजार पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) अद्यापही प्रलंबित आहेत. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विविध कारणांमुळे त्याबाबतची आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आलेली नाही. सर्वसाधारण बदल्या ३१ मेपूर्वी कराव्यात, असे बदली अधिनियमात म्हटले आहे. तरी पोलीस दलात वरिष्ठांच्या मनमानीमुळे हा नियम केवळ कागदावरच राहिला आहे. यावर्षी आजपर्यंत केवळ साहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक असलेल्या निरीक्षक, एपीआय व पीएसआयच्या बदल्या प्रलंबित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा २२५ पीआय, ३५० एपीआय व ४२५ पीएसआय बदलीसाठी पात्र आहेत. एका पोलीस ठाण्यात किंवा विभागात दोन वर्षे तर गुन्हे, वाहतूक व विशेष शाखेसाठी तीन वर्षे पूर्ण झालेल्यांची बदली करणे अनिवार्य आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे हा नियम कागदावरच राहिला आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या बदल्या रखडल्या
By admin | Published: June 22, 2016 2:33 AM