आरोपींना वाचवण्याचे पोलिसांचे प्रयत्न
By admin | Published: April 3, 2017 03:06 AM2017-04-03T03:06:27+5:302017-04-03T03:06:27+5:30
मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून चार महिन्यांपूर्वी पाच आरोपींना दिंडोशी पोलिसांनी अटक केली
मुंबई : आपल्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून चार महिन्यांपूर्वी पाच आरोपींना दिंडोशी पोलिसांनी अटक केली असली तरी अन्य दोन आरोपींची नावे सांगूनही पोलीस त्यांचा आरोपींमध्ये समावेश करीत नसल्याची तसेच अटक आरोपींचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मालाड (पूर्व) येथे राहणारी बळीत मुलीची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तिची १६ वर्षीय मतिमंद मुलगी २१ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने दुसऱ्या दिवशी दिंडोशी पोलीस ठाण्यात मिसिंग कम्प्लेंट दाखल करण्यात आली. सगळीकडे शोध सुरू असतानाच मालवणी येथील एका व्यक्तीने आपण त्या मुलीला दाणापाणी परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी मुलगी पालकांनाच दाणापाणी परिसरात फिरताना आढळली. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीकडे केलेल्या चौकशीत राहुल गेचंद, नितीन सारसर, नवीन सारसर, बॉबी गुस्सार आणि विजय गुस्सार यांनी बलात्कार केल्याचे निदर्शनास आल्याने दिंंडोशी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींनी मुलीला दाणापाणी येथे नेऊन सोडल्यानंतर ती सापडेपर्यंतच्या कालावधीत आरोपी दररोज रात्री रिक्षाने तेथे जाऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करीत, असे तपासात आढळले. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.
११ जानेवारी रोजी पीडित मुलगी आपल्यासोबत दुकानात जात असताना एका मुलाला पाहून घाबरली. तिला विचारणा केली असता तिने त्या मुलाने तसेच त्याच्या मित्रानेही आपल्यावर मोकळ्या मैदानात तसेच एका कारमध्ये बलात्कार केल्याचे सांगितले. आपण त्याबाबत दिंडोशी पोलिसांना कळवले तरी पोलिसांनी त्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यास नकार दिला तसेच चिंचोली पुलाखाली पार्क केलेल्या कारची माहिती देऊनही ती कार जप्त केली नाही, अशी तक्रार मुलीच्या आईने निवेदनात केली आहे.
दोन्ही संशयितांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात यावा. तसेच या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे.
>गृहमंत्र्यांना निवेदन
पीडित मुलीच्या जबानीनुसार दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता चुकीची माहिती दाखल करून योग्य ते कलम लावण्यात आले नसल्याने या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आमदार अबू आझमी यांनी गृहमंत्र्यांना दिले आहे. दरम्यान, काही आरोपी माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.