मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आता डबल मास्क लावण्याची वेळ आली आहे. पालिकेकडून याबाबतच्या सूचना मिळताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली असून पोलिसांना फेस शिल्ड आणि डबल मास्क घालण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापाूसन अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्या व्यक्तींची माहिती घेणे आदी अनेेक कामे पोलिसांच्या खांद्यावर आहेत. यादरम्यान त्यांचा थेट जनतेशी संपर्क येताे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका पोलीस दलालाही बसत आहेत. आतापर्यंत मुंबईत १०५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५०० हून अधिक कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नगराळे यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड, डबल मास्कचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी स्वतःची काळजी घ्यावी, असेही पाेलीस आयुक्तांनी सांगितले.
कर्मचारी, अधिकाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी हे आदेश देण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले.
..............................