नवी मुंबई : सागरी सुरक्षेची गस्त प्रभावीपणे घालता यावी, याकरिता पोलिसांना ड्रोन व थर्मल गॉगल देण्याचे शासन स्तरावर प्रस्तावित आहे. त्यानुसार, दोन्ही उपकरणांची महिन्यापूर्वी चाचणीदेखील घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सागरी पोलिसांना या दोन्ही अद्ययावत उपकरणांची प्रतीक्षा लागली आहे.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत सरकार अधिक सतर्क राहात आहे. मुंबईसह नवी मुंबईची सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून, बोटीमार्फत नियमित गस्त घातली जात आहे. मुंबईत प्रवेशासाठी दहशतवाद्यांकडून नवी मुंबईचादेखील मार्ग वापरला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुंबईपाठोपाठ नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेवरही भर देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीला नवी मुंबई पोलिसांकडे सागरी गस्तीसाठी सात बोटी आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सुमारे एक हजार कि.मी. क्षेत्रफळापैकी १४४ कि.मी. चा सागरी किनारा असून, सुमारे ३५ लँडिंग पॉइंट आहेत. त्या सर्व ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र, रात्रीच्या गस्तीदरम्यान त्यांना दूरवर समुद्रात सुरू असलेल्या हालचाली पाहण्यात अडचणी येत आहेत. महिन्यापूर्वी थर्मल गॉगल व ड्रोन कॅमेऱ्याची मुंबईत चाचणी घेण्यात आली. समुद्रात हवेच्या दबावापुढे टिकेल, असा ड्रोन कॅमेरा पोलिसांना आवश्यक असून, तसा ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शोधात पोलीस प्रशासन असल्याने पोलीस अद्यापही दोन्ही उपकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांना प्रतीक्षा थर्मल गॉगल, ड्रोनची
By admin | Published: April 19, 2017 1:06 AM