पवारांच्या घरावरील हल्ल्याची पोलिसांना कल्पना होती; FIRमुळे प्रकरणाला वेगळं वळण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:11 PM2022-04-09T14:11:33+5:302022-04-09T14:12:12+5:30
पोलिसांच्या एफआयआरमधून वेगळीच माहिती उघडकीस
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं असताना आता एफआयआरमधून वेगळीच माहिती समोर आली आहे. पोलिसांना या हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. त्यामुळे हल्ला प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची पोलिसांना कल्पना होती, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. आंदोलनाची कल्पना असल्यानं बंदोबस्त
तैनात केल्याचा दावा करण्यात आला आहे. 'एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाच्या अनुषंगानं काही व्यक्तींच्या चिथावणीनुसार एसटी कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार आणि मंत्री यांच्या निवासस्थानीसुद्धा आंदोलन करतील अशा आशयाची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती,' असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
गोपनीय माहितीच्या अनुषंगानं गावदेवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओक इस्टेट या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता, असं पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. आंदोलक एसटी कर्मचारी पवारांच्या घराबाहेर जाणार याची कल्पना होती, ही बाब एफआयआरमधून स्पष्ट होत आहे.
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिलेल्या चिथावणीमुळे तसंच इतर व्यक्तींशी फौजदारी कट करून ८ एप्रिलला सिल्वर ओक येथे बेकायदेशीरपणे लोकांना जमवलं. सिल्वर ओक खासगी मालमत्ता असल्यानं कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र पोलीस शासकीय कर्तव्य पार पाडत असताना आंदोलकांनी चपला आणि दगड फेकले. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले, असा तपशील एफआयआरमध्ये आहे.