बडतर्फ पोलीसही करत होता व्हेल माशाच्या उलटीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:04+5:302021-06-25T04:06:04+5:30
गुन्हे शाखेकडून अटक; पावणेआठ कोटींची उलटी जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळख असलेल्या व्हेल ...
गुन्हे शाखेकडून अटक; पावणेआठ कोटींची उलटी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळख असलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ केलेल्या पोलिसाचाही समावेश असल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या कारवाईतून उघड झाले. प्रसाद हिराचंद पिंगळे (४४) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून, त्याच्याकडून पावणेआठ कोटींची उलटी जप्त करण्यात आली आहे. पिंगळेला उलटी पुरविणाऱ्या मच्छीमाराचा शोध सुरू आहे.
लोअर परळ येथील सीताराम कम्पाउंड परिसरात दोघे जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी बुधवारी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निसर्ग ओतारी, प्रकाश लिंगे, सिद्धेश ज्योष्टे आणि पोलीस अंमलदार युवराज देशमुख, भास्कर गायकवाड, चंद्रकांत काळे, मंगेश शिंदे, राहुल पाटील यांनी सीताराम कम्पाउंड परिसरात कारमधून आलेल्या पिंगळेसह अमित विकास पाटील (३६) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ किलो ७५० ग्रॅम उलटी जप्त केली. याची किंमत पावणेआठ कोटी आहे.
दोघेही अलिबागचे रहिवासी आहेत. यातील पिंगळे हा पायधुनी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. तो वैद्यकीय रजेवर गेला हाेता. त्यानंतर ५ वर्षे हजर झाला नाही. त्याला सेवेची गरज नसल्याचे समजून २०१६ मध्ये त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. पिंगळेने मच्छीमार मंगेश नावाच्या तरुणाकडून दोन महिन्यांपूर्वी आक्षी-बेलपाडा फाटा अलिबाग येथून व्हेल माशाची उलटी विक्री करण्याकरिता घेतली होती. या उलटीची विक्री केल्यानंतर पिंगळेने मंगेशला ४० लाख रुपये देण्याचा साैदा झाला हाेता. मंगेशचा शोध सुरू आहे.
आराेपीला एन.एम. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून ते अधिक तपास करत आहेत.
* यापूर्वी ४ कोटींची उलटी जप्त
गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या त्रिकूटाला बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून २ कोटी ७० लाखांची उलटी जप्त केली.
* ...यासाठी होते तस्करी
व्हेल माशाची उलटी उर्फ समुद्रात तरंगते सोने हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो. याचा वापर अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच, खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. याची खरेदी-विक्री हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. शासनाची बंदी असूनही काही जण याची मोठ्या प्रमाणात तस्करी करताना दिसून येत आहेत.
....................................