लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी साकीनाका, देवनार आणि कुरार पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
देवनार पोलिसांनी, महिला पोलिस शिपाई मनीषा देशमुख (३५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये देशमुख स्वत: जखमी झाल्या आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड परिसरात एका दाम्पत्यात वाद सुरू असताना त्यांनी मध्यस्थी केली. याचदरम्यान साफिया फिरोज खान (२८) या महिलेने त्यांना शिवीगाळ करत त्यांचे केस ओढून मारहाण केली. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर नखाने ओरडबाडले. तर, तिचा पती फिरोज खान (४५) पसार झाला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत, साफियाला अटक करण्यात आली. पुढे नोटीस देत तिला सोडण्यात आले. दुसऱ्या घटनेत साकीनाका येथे संघर्षनगर परिसरात रॉबिन कडमची ऊर्फ सलीम एडा उभा असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेताच त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, पोलिसाला चेहऱ्यावर मारून जखमी केले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत घातला धिंगाणातर, तिसऱ्या घटनेत, मालाड परिसरात अनिल हिवाळे आणि शेख बनसोडे हे दोघे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असताना पोलिस शिपाई संतोष सुरनर यांनी त्यांना हटकले. याच रागात, आरोपींनी, पोलिसाला धक्काबुकी करत त्यांना मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले आहेत, पोलिसांनी दोघांनाही अटक करत अधिक तपास करत आहेत.