बाप, भाऊ, मुलाची ‘छाया’ असलेली पोलीस महिला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:27 AM2018-03-08T04:27:31+5:302018-03-08T04:27:31+5:30
छाया नाईक हे पोलीस दलातील असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपले सर्व आयुष्यच त्याग आणि समर्पणात वेचले. आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वत: अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वत:च्या आईचाही सांभाळ केला. पोलीस खात्यात ३७ वर्षे सचोटीने नोकरी केली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - छाया नाईक हे पोलीस दलातील असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपले सर्व आयुष्यच त्याग आणि समर्पणात वेचले. आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वत: अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वत:च्या आईचाही सांभाळ केला. पोलीस खात्यात ३७ वर्षे सचोटीने नोकरी केली. सध्या त्या मुंबई पोलीस मुख्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वयाच्या सोळाव्या वर्षी छाया यांच्या खांद्यावर ५ बहिणींची जबाबदारी पडली. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या वडिलांनी अचानक जगाचा निरोप घेतला. वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर छाया यांना वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. मात्र दरम्यानच्या दोन वर्षांत राहत्या घरातच राहण्याच्या परवानगीपासून रोजच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. कपडे शिवून मिळवलेल्या पैशांतून छाया यांनी मोठ्या हिंमतीने घर सावरले.
पौगंडावस्थेत प्रवेश केलेल्या मनात गुलाबी स्वप्न असलेल्या छाया यांनी आईला धीर देत बहिणींची जबाबदारी सांभाळणे हेच एकमेव ध्येय बनवले. नोकरी ही बाबांची आहे, म्हणून त्यांचे कर्तव्यही छाया यांनी खांद्यावर घेतले.