पोलीस पत्नीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 07:13 PM2018-07-05T19:13:33+5:302018-07-05T19:21:22+5:30
निलंबित झालेल्या पोलीस पतीला कामावर घ्यावे म्हणून पोलीसपत्नी यशश्री पाटील यांनी मंत्रालयात घोषणाबाजी करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
मुंबई : निलंबित झालेल्या पोलीस पतीला कामावर घ्यावे म्हणून पोलीसपत्नी यशश्री पाटील यांनी मंत्रालयात घोषणाबाजी करत आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन त्या उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी अडविले. सुदैवाने दुर्घटना टळली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने मंत्रालयात शुकशुकाट असताना दुपारच्या सुमारास पाटील यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सरकत्या जिन्यावरून वंदे मातरम, जय किसान अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच आत्महत्येचा प्रयत्नात असलेल्या या महिलेला मंत्रालयात सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या महिलेस ताब्यात घेऊन सोडण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न एका शेतकरी युवकाने केला होता. तर धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता.