मुंबई : कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणाऱ्या विलास शिंदेंच्या हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करावी, या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या पत्नींनी शनिवारी कृष्णकुंजवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी पोलीस कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या समस्यांनाही वाचा फोडण्यात आली. शिंदे यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र कायम आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस पत्नींनी शनिवारी राज ठाकरेंची भेट घेतली. शिंदे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी केली. राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी योग्य भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले. यापूर्वी राज यांनी हल्लेखोरांना जामीन मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देत पोलिसांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले होते. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे; परंतु पोलीसच सुरक्षित नसतील तर कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे ते स्पष्ट होते. त्यामुळे याला आळा घालणे गरजेचे असल्याचे राज यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मनसे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज यांनी दिले. (प्रतिनिधी)
पोलीस पत्नींनी घेतली राज ठाकरे यांची भेट
By admin | Published: September 04, 2016 3:59 AM