पोलिसांना बदलीनंतर २५ हजारांचे अग्रीम मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:10+5:302021-09-21T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. एका घटकातून अन्य घटकामध्ये बदली झाल्यास त्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. एका घटकातून अन्य घटकामध्ये बदली झाल्यास त्यांना स्थलांतरणासाठी येणाऱ्या खर्चासाठी २५ हजार रुपयांचे अग्रीम मिळणार आहे. पोलीस कल्याण निधीतून मिळणारी ही रक्कम त्यांना १३ महिन्यात परतफेड करावयाची आहे. पोलीस मुख्यालयातून त्याबाबत सर्व घटकप्रमुखांना सूचना करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांना एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये बदली झाल्यानंतर त्यांना स्थलांतर करण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो, पण ही रक्कम दप्तर दिरंगाईमुळे मिळण्यासाठी काही महिने जातात. मात्र त्यावेळी अधिकारी, अंमलदाराना प्रापंचिक साहित्य हलविणे, पाल्यांना शाळेत प्रवेश व अन्य बाबीसाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी त्यांच्या विनंतीनुसार कार्यमुक्त होताना तेथील पोलीस कल्याण निधीतून जास्तीत जास्त २५ हजार अग्रीम दिले जातील, त्यांच्या अंतिम वेतन पत्रातून त्याबाबत बदलीच्या घटकाला कळविले जाईल, त्यानंतर संबंधित पोलीस घटकांकडून पहिले तीन महिने झाल्यानंतर पुढील १० महिन्यांच्या वेतनातून समान हप्त्यामधून ही रक्कम कपात करून घेतली जाईल, याचा लाभ संबंधित गरजू पोलीस अधिकारी, अंमलदारांनी घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.