गेल्या आठवड्यात भारतातील विविध राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक लोकांना प्रवासादरम्यान, अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक जण ट्रॅफिकमध्ये अडकले. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी रस्त्यावर माती टाकताना दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, तो असं का करत आहे, तर आम्ही यामागचं कारण सांगतो.
ट्विटरवर एका युझरने आपल्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये पोलीस असं का करत आहेत, हे सांगितलं आहे. त्यात लिहिलं आहे की, भांडुप पम्पिंग सिग्नलवर पावसामुळे अनेक बाईक घसरत होत्या. एका ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्याने अग्निशमन दलाला फोन केला. मात्र त्याने वाट पाहिली नाही. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वत: पुढाकार घेत रस्त्यावर माती टाकली. तसेच या युझरने हे ट्विट मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. या ट्विटमध्ये शेअर केलेला फोटो हा मुंबई पोलिसांच्या एका ट्रॅफिक पोलिसांचा आहे.
या फोटोमध्ये तुम्ही एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी थेट एका फ्लायओव्हरखाली रस्त्यावर माती टाकताना दिसत आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर बऱ्याचदा चिखल साचतो. त्यामुळे अपघात होऊ शकतात. मात्र येथे अपघात होऊ नये म्हणून या अधिकाऱ्याने खबरदारी घेतली आहे. ही पोस्ट ६० हजारवेळा पाहिली गेली आहे. तसेच त्यावर अनेक पॉझिटिव्ह कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्याने सर्वसामान्यांकडून या अधिकाऱ्याचे आभार मानले जात आहेत. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी अशा पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे.