मुंबई : माहीम पोलिस ठाण्यातून सशस्त्र विभागात बदली झाल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेटसाठी कैलास गवळी (३९) या पोलिसाने नागपाडा रुग्णालय गाठले. तेथे तपासणीसाठी दाखल करून घेताच रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविल्याने खळबळ उडाली आहे.
गवळी यांची माहिमवरून वरळी येथील एल-३ विभाग कार्यालयात बदली करण्यात आली होती. त्या काळात ते ८९ दिवस गैरहजर राहिल्याने तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागपाडा पोलिस रुग्णालयात गवळी गेले होते. तेथे तपासणीसाठी त्यांना रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये दाखल करून घेतले.
रविवारी सकाळी नैसर्गिक विधीच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेले. तेथील खिडकीतून त्यांनी खाली उडी मारली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला.