रात्रपाळीसाठी कामावर येताना पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:00 AM2017-10-29T05:00:46+5:302017-10-29T05:00:55+5:30
रात्रपाळीसाठी कर्तव्यावर येत असताना रेल्वे पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय शिवाजी शिंदे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
मुंबई : रात्रपाळीसाठी कर्तव्यावर येत असताना रेल्वे पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय शिवाजी शिंदे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात रात्रपाळीसाठी हजर होत असताना कांजूरमार्ग स्थानकाजवळ ते जखमी अवस्थेत आढळले. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामाच्या तणावामुळे शिंदे यांनी आत्महत्या केली? की हा अपघात आहे? या दिशेने कुर्ला रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिंदे हे कल्याण येथे राहत असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. शुक्रवारी रात्री रात्रकालीन कर्तव्यावर हजर होण्यासाठी शिंदे घरातून निघाले होते. मात्र कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात पोल क्रमांक २४/६ ते २४/७ यांदरम्यान रुळाशेजारी पडलेल्या अवस्थेत आढळले. रात्री १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शिंदे यांच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली होती. रुळाजवळ शिंदे जखमी असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिंदे यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा डॉक्टरांनी शिंदे मृत झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, शिंदे यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे? की लोकलमुळे अपघात झाला आहे? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.