मुंबई : दादर येथे निवडणूक बंदोबस्तादरम्यान ३८ वर्षीय पोलीस हवालदाराचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विलास यादव असे पोलिसाचे नाव असून ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. यादव हे डोंबिवलीचे रहिवासी असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी जानेवारी महिन्यापासून तैनात होते.लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची फ्लाइंग स्क्वॉडमध्ये नेमणूक करण्यात आली होती.
सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे काम असायचे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या डिसिल्व्हा हायस्कुलमध्ये रिपोर्टींग केल्यानंतर जिथे कॉल येईल त्यानुसार ते पथकासोबत बाहेर जात होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी रिपोर्टींग केले. रिपोर्टींग केल्यानंतर त्यांना काही वेळाने अस्वस्थ वाटू लागले. घाम फुटला आणि काही समजण्याच्या आतच ते चक्कर येऊन कोसळल्याने खळबळ उडाली. अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले.
तेथे डॉकटर उपलब्ध नसल्याने काही मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच पावणे आठच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सर्वानाच धक्का बसला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ते पत्नी आणि दोन मुलीसोबत राहायचे. कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.