ख्रिसमस बंदोबस्तावरील पोलिसाचे डोके फोडले! मालाडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:50 IST2024-12-26T13:50:01+5:302024-12-26T13:50:12+5:30
हल्लेखोराचा शोध सुरू

ख्रिसमस बंदोबस्तावरील पोलिसाचे डोके फोडले! मालाडमधील घटना
मुंबई : ख्रिसमसनिमित्त बंदोबस्तावर असलेल्या एका ५२ वर्षीय पोलिसावर लाकडी दांड्याने हल्ला करत त्यांचे डोके फोडण्यात आल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अरुण हरिजन हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तक्रारदार माणिक सावंत है मालाड पोलिस ठाण्यात सहायक फौजदार आहेत. ख्रिसमसच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते २४ डिसेंबरच्या दुपारी रामचंद्र स्टेशन लेनवरून काचपाडा जंक्शनच्या दिशेने वाहनातून गस्त घालत होते. त्यावेळी ओल्ड सोनल इंडस्ट्रीजवळ वाहतूककोंडी झाली होती, तेथे एक व्यक्ती वाहनांना अडथळा निर्माण करत असल्याचे त्यांना दिसले. सावंत यांनी त्याला रस्त्याच्या कडेला नेत तेथून निघून जायला सांगितले. त्यावर त्याने सावंत यांच्यासोबत हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.
तातडीने नेले रुग्णालयात
शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीकडे सावंत यांनी दुर्लक्ष करत त्यांचे सहकारी अंमलदार गायकवाड यांच्यासह रस्त्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करायला सुरुवात केली. तेव्हा या व्यक्तीने सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या उजव्या कानावर लाकडी दांड्याने जोरात फटका मारला. त्यामुळे सावंत चक्कर येऊन खाली पडले.
गायकवाड ते पाहताच तातडीने सावंत यांना पोलिस वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोर अरुण हरिजन हा फरार असून, त्याच्याविरोधात मालाड पोलिस ठाण्यात बीएनएस कायद्याचे कलम ३५२,१३२,१०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.