Join us

चोरट्याच्या पाठलागात पोलिसावर चाकूने वार; पवईतील घटना, आरोपीला अटक 

By मनीषा म्हात्रे | Published: April 13, 2023 3:13 PM

मरोळ पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस शिपाई प्रशांत शशीकांत धुरी (३२) यामध्ये जखमी झाले आहे.

मुंबई : पोलिसांवरील हल्ले वाढत असतानाच, चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडण्याच्या झटापटीत आरोपीने पोलिसाला जिवेठर मारण्याची धमकी देत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्याप्रकरणी पसार चोरट्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मरोळ पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस शिपाई प्रशांत शशीकांत धुरी (३२) यामध्ये जखमी झाले आहे. जोगेश्वरीच्या ट्रामा हॉस्पीटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास पवई येथील एल अॅण्ड टी गेट नं ६ समोर संतोष बारजवळ धुरी हे गस्त घालत असताना, सुब्रतो चितरंजन दास (२८) व त्याचा साथीदार आकाश हे बारचे बंद शेटर उचकटुन आत प्रवेश करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांच्याकडे धाव घेतली. पोलिसांना पाहून दोघांनी पळ काढला. चोर पोलिसांमध्ये फिल्मी स्टाईलने पाठलाग रंगला असताना काही अंतरावर, वाहतूक पोलिसांनी वाट अडवून सुब्रतोला पकडले. मात्र, साथीदार पळण्यास यशस्वी झाला.

वाहतूक पोलिसांकडून सुब्रतोला ताब्यात घेत असताना, "तू पोलीस है तो क्या हुआ तुझे भी मार डालूंगा" असे म्हणत खिशातून चाकू काढून धुरी यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. स्वतला वाचविण्यासाठी ते मागे होताच आरोपीने पोटावर वार करत तेथून पळ काढला. अन्य पोलिसांच्या मदतीने त्यांना जोगेश्वरीच्या ट्रामा हॉस्पीटल येथे दाखल केले. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.

आरोपीला बेड्या

आरोपी एल अॅण्ड टी गेट नं ६ मधून आत पळाल्याचे समजताच डिटेक्शन स्टाफने आतमध्ये परिसर पिंजून काढत अखेर, काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. तर त्याचा साथीदार आकाशचा शोध सुरू आहे.

टॅग्स :मुंबईपोलिस