मुंबई : नातेवाइकांना भेटून घरी जात असताना एका तरुणाला धारदार चॉपरने वार करून लुटणा-या तिघा जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन बिरसिंग सोनार उर्फ नेपाळी (३२, रा. रबाळे, नवी मुंबई), इरफान मुशीर शेख (२४, रा. साकीनाका), इब्राहिम शब्बीर शेख (२३, रा. पवई) अशी त्यांची नावे असून हल्ल्यावेळी वापरलेला चॉपर व रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.भांडुप येथील टेंभीपाडा येथे राहत असलेला नितीन गोविंद मांडगावकर हा शनिवारी सायंकाळी पवई गार्डन येथील नातेवाइकांना भेटून घराकडे जात असताना एमआयडीसी परिसरात त्याला एका रिक्षातून आलेल्या तिघांनी अडविले. चॉपरचा धाक दाखवीत त्याच्याकडील मोबाइल व रोख रक्कम काढून घेतली. एकाने चॉपरने त्याच्या हातावर वार केला. ते रिक्षातून निघून गेल्यानंतर नितीनने पोलीस ठाण्यात दाखल होत घटनेची माहिती व रिक्षाचा नंबर पोलिसांना दिला. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षक कोळपे यांनी तातडीने वायरलेसवरून ही माहिती दिल्यावर मोरारजीनगर परिसरात गस्त घालत असलेल्या बीट मार्शल पवन शिंदे व कॉन्स्टेबल खिलारी यांना सदर क्रमांकाची रिक्षा आढळून आल्याने त्यांनी त्यांना पकडले. लुटण्यात आलेले मोबाइल व रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार व वाहन जप्त केले. या तिघांकडून चोरी, लुटीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
पवईत तरुणाला धारदार चॉपरने वार करून लुटणा-या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:32 AM