Join us

शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य बजावत राहिली 'वर्दी', आरोपीला उपचारासाठी घेऊन आलेल्या पोलिसाने रुग्णालयातच सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:21 PM

Mumbai Police News: ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील पोलीस अंमलदाराचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मुंबई : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील पोलीस अंमलदाराला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉक्टरांकडे जात औषध देण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासणी करताच, ते अचानक कोसळले आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. शैलेंद्र  राजाराम धनावडे (वय ४९) असे अंमलदाराचे नाव असून, त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.धनावडे हे पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत परळ येथील महादेवाची वाडी गृहनिर्माण संस्था या कॉलनीत राहण्यास होते. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. सकाळी १० च्या सुमारास अन्य साथीदारांसोबत आरोपीला मेडिकलला घेऊन जाण्यासाठी ते निघाले. प्रवासात त्यांनी ॲसिडिटी झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले होते. पुढे रुग्णालयात पोहोचताच जास्तच अस्वस्थ  वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी डॉक्टरांकडे तपासणी करून घेण्यास सांगितले. ते डॉक्टरांकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना असह्य वाटत आहे मला औषध द्या, असे सांगितले.  डॉक्टरांनी त्यांच्या उपचारास सुरुवात केली आणि ई.सी.जी.  करत असतानाच ते अचानक कोसळले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले, पण पुढे तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे.

शासकीय इतमामात देण्यात आली सलामीरविवारी सायंकाळी त्यांच्यावर भोईवाडा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस सशस्त्र दल, नायगाव यांच्यातर्फे शासकीय इतमामात सलामी देण्यात आली.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबई