Join us

प्रेयसीच्या आठवणीत आला पोलिसांचा कॉल

By admin | Published: March 23, 2017 1:54 AM

एखादी मुलगी आवडली म्हणून तिचा पाठलाग करून तिच्या होकार मिळावा, म्हणून तिला मोबाइल क्रमांक देणे वरळीच्या एका तरुणाला

मुंबई : एखादी मुलगी आवडली म्हणून तिचा पाठलाग करून तिच्या होकार मिळावा, म्हणून तिला मोबाइल क्रमांक देणे वरळीच्या एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. त्या तरुणीऐवजी त्याला पोलिसांचाच कॉल आला आणि पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत त्याला अटक केली. आकाश खरात (२३) असे प्रतापी तरुणाचे नाव असून, तो वरळी परिसरात राहतो. सोमवारी येथील एका इमारतीखाली उभ्या असलेल्या तरुणीशी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. या तरुणीसोबत मैत्री करण्यासाठी त्याने तिचा पाठलाग केला. आपल्यासोबत बोलावे, म्हणून तिच्याकडे आग्रह केला. त्याला काहीही प्रतिसाद न देता, ती तेथून निघून गेली.मंगळवारी याच परिसरात मैत्रिणीची वाट पाहत असताना, खरातने तिला पुन्हा अडविले. तिने त्याला पाहून थेट कॅब थांबविली. त्याने त्याचदरम्यान मोबाइल क्रमांक असलेली चिठ्ठी तिच्याकडे फेकत पळ काढला. तरुणीने झालेला प्रकार कुटुंबीयांना कळविला. मैत्रिणीनेही तिला याबाबत तक्रार देण्याचा सल्ला दिला. तिने तत्काळ वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे खरात हा तरुणीच्या फोनची वाट पाहात होता. अनोळखी क्रमांकाने मोबाइलवर कॉल आला. तरुणीचा कॉल असावा, या आनंदात त्याने फोन उचलला. मात्र, आलेल्या कॉलने त्याला धडकीच भरली. तरुणीऐवजी पोलिसांनीच त्याला कॉल केला होता. त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. आपल्याकडून खूप मोठी चूक झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. (प्रतिनिधी)