ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशहा पारकरचा बुधवारी सकाळी मुंबईतील नागपाडा भागात पारंपारिक मुस्लिम रिवाजानुसार विवाहसोहळा पार पडला. सकाळी ११ च्या सुमारास नागपाडयाच्या मशिदीत अलीशहा आयशा नागानी या तरुणीबरोबर विवाहबद्ध झाला.
जवळपास दीडतास चाललेल्या या विवाहसोहळयाला १०० कुटुंबिय उपस्थित होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विवाहस्थळी जमले होते मात्र त्यांना दूर ठेवण्यात आले. अलीशहा दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे. आयशा मुंबईतील व्यावसायिकाची मुलगी आहे.
आज रात्री मुंबईतील आलिशान पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वागतसमारंभ होणार असून, या स्वागतसमारंभावर मुंबई पोलिसांची करडी नजर असेल. स्काईपवरुन दाऊद हा विवाहसोहळा पाहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खंडणी विरोधी पथकाला विवाह सोहळयावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
अलिशहाचा मोठा भाऊ दानिशचा २००६ साली रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्याची बहिण उमायराचा मे २०१५ मध्ये विवाह झाला.